छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महापालिकेच्या स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड करण्यात येणार असून, विविध पाच समितींचे सदस्यही निवडले जाणार आहेत. त्यासाठी उद्या ५ मार्च रोजी विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत गटनेत्यांना स्थायी समितीसाठी सदस्यांची नावे कळवावी लागणार आहेत. यात राजकीय पक्षाच्या संख्येबळानुसार स्थायी समितीच्या १६ सदस्य निवडताना भाजपला ८, एमआयएमला ४, शिंदेगट २, उबाठा गटाला १ आणि लोकसेवा विकास आघाडीला १ सदस्य द्यावा लागणार आहे.
महापालिकेसाठी शहरातील २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक असून, यात भाजपचे सर्वाधिक ५७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ एमआयएम ३३, शिदेगट १३, शिवसेना ६, वंचित बहुजन आघाडी ४, काँग्रेस १, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) १ या प्रमाणे नगरसेवकांची संख्या आहे. याच नगरसेवकांमधून स्थायी समितीसाठी १६ सदस्य निवडवावे लागणार आहेत. या सभेत स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड केली जाणार आहे. विविध राजकीय पक्षाच्या गटनेत्यांना स्थायी समितीसाठी नगरसेवकांची नावे द्यावी लागणार आहे.













